सातारा. दि 14: वसंतराव नाईक तांडा / वस्ती सुधार योजने अंतर्गत विकास कामांचे प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन समाज कल्याणचे सहायक आयुक्त नितीन उबाळे यांनी केले आहे.
महाराष्ट्र राज्यात भटक्या जमातीच्या अनेक जाती जमाती अजूनही भटकंती करुन स्थलांतरित स्वरुपाचे जीवन जगतात. लमाण, बंजारा, वंजारी, धनगर, पारधी अशा अनेक समूहांचे तांडे / वस्त्या असून अशा तांडयांमध्ये या जमाती अनेक वर्षापासून रहात असल्या तरी अशा तांडे किंवा वस्त्यांना प्राथमिक सुविधा उपलब्ध होत नाहीत व त्यामध्ये आधुनिकतेकडे कल असला तरी बहुसंख्य समाज गोर गरीबीचे जीवन जगत आहे त्यासाठी तांडे, वाडी किंवा वस्त्यामध्ये या समाजास स्थिर जीवन जगता यावे या करिता महाराष्ट्र शासन विमुक्त जाती, भटक्या जमाती इतर मागास प्रवर्ग व विशेष मागास प्रवर्ग कल्याण विभागाच्या 30 जानेवारी 2018 रोजीच्या शासन निर्णयानुसार वसंतराव नाईक तांडा/ वस्ती सुधार योजने अंतर्गत राबविण्यात येते.
50 ते 100 लोकसंख्या असलेले तांडे / वस्त्या रुपये 4 लक्ष, 101 ते 150 लोकसंख्या असलेले तांडे / वस्त्या 6 लक्ष व 151 पेक्षा अधिक लोकसंख्या असलेले तांडे /वस्त्या 10 लक्ष अनुदान देण्यात येते
योजनेनुसार घ्यावयाची कामे –
1. विद्युतीकरण 2. पिण्याचे पाणी 3. अंतर्गत रस्ते 4. गटारे 5. शौचालये तसेच समाज मंदिर / वाचनालय व शक्य असेल तिथे मुख्य रस्त्याला जोडणाऱ्या रस्त्यांची कामे.
तांडा / वस्ती योजनेकरिता निधी वाटप करतानाचा प्राधान्यक्रम
1) गावातील ज्या तांडा / वस्त्यांना अद्यापही काहीच लाभ दिला नाही अशा तांडा/वस्त्या.
2) जादा अनुदानाचे लाभ देणे बाकी आहे अशा तांडे / वस्त्या .
3) प्रस्तावित काम इतर कोणत्याही योजना / निधी मधून यापूर्वी घेतलेले नसावे.
सदर योजने अंतर्गत प्रस्तावित कामांना प्रशासकीय मंजुरी देण्याचे अधिकार शासन स्तरावर राहतील. योजनेचा बृहत आराखडयाचा कालावधी 31 डिसेंबर 2023 रोजी संपुष्टात येणार असून त्यापुर्वी सातारा जिल्हयातील ज्या ग्रामपंचायतींना विकास कामे करावयाची आहेत व बृहत आराखडयामध्ये योजनेनुसार घ्यावयाची कामे नमुद आहेत त्यांनी आपले प्रस्ताव ग्रामपंचायती मार्फत गटविकास अधिकारी यांच्या मान्येतेने सहायक आयुक्त, समाज कल्याण, सातारा या कार्यालयास सादर करावे, असे आवाहन श्री. उबाळे यांनी केले आहे.










