फलटण प्रतिनिधी :
मराठी वृत्तपत्रसृष्टीचे जनक ‘दर्पण’कार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या 178 व्या पुण्यतिथीनिमित्त महाराष्ट्र पत्रकार कल्याण निधीच्यावतीने शुक्रवार, दि.17 मे 2024 रोजी सकाळी 11:00 वा. पोंभुर्ले (ता.देवगड, जि.सिंधुदुर्ग) येथील संस्थेच्या ‘दर्पण’ सभागृहात अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. सदरचा अभिवादन कार्यक्रम श्रीराम एज्युकेशन सोसायटी (फलटण) चे मानद सचिव डॉ.सचिन सूर्यवंशी - बेडके व विष्णुबुवा ब्रह्मचारी सामाजिक केंद्र, शिरवली (माणगांव) चे सचिव सुरेश गोखले यांच्या हस्ते, संस्थेचे अध्यक्ष तथा शासनाच्या महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाचे सदस्य, ज्येष्ठ पत्रकार रवींद्र बेडकिहाळ यांच्या अध्यक्षतेखाली व पोंभुर्लेचे माजी सरपंच सादिक डोंगरकर व सुधाकर जांभेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न होणार आहे, अशी माहिती संस्थेचे कार्यकारी विश्वस्त विजय मांडके यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये दिली.
महाराष्ट्र पत्रकार कल्याण निधी, जांभेकर कुटुंबिय, जांभे - देऊळवाडी ग्रामस्थ व पोंभुर्ले ग्रामपंचायत यांच्या सहकार्याने आयोजित या अभिवादन कार्यक्रमात प्रतिवर्षी संस्थेकडून देण्यात येणार्या प्रतिष्ठेच्या ‘राज्यस्तरीय दर्पण पुरस्कारां’ची (सन 2024) घोषणा होणार आहे. तरी या अभिवादन कार्यक्रमास जिल्ह्यातील पत्रकार, साहित्यिक, वृत्तपत्रप्रेमींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असेही आवाहन महाराष्ट्र पत्रकार कल्याण निधीच्यावतीने करण्यात आले आहे.











