गोंदी, ता. कराड येथील एका सेवानिवृत्त वैद्यकीय अधिकाऱ्याला सुमारे दीड लाखांचा ऑनलाईन गंडा घातल्याचा प्रकार घडला आहे. बँकेचे अॅप्लिकेशन बंद पडल्याची सबब सांगून त्यांच्या खात्याची माहिती घेऊन चोरट्याने फसवणूक केली आहे.
कराड : गोंदी, ता. कराड येथील एका सेवानिवृत्त वैद्यकीय अधिकाऱ्याला सुमारे दीड लाखांचा ऑनलाईन गंडा घातल्याचा प्रकार घडला आहे. बँकेचे अॅप्लिकेशन बंद पडल्याची सबब सांगून त्यांच्या खात्याची माहिती घेऊन चोरट्याने फसवणूक केली आहे. याबाबत प्रभाकर कृष्णराव पवार रा. गोंदी, ता. कराड यांनी कराड ग्रामीण पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, गोंदी येथील माजी वैद्यकीय अधिकारी प्रभाकर पवार यांचे एका राष्ट्रीयकृत बँकेत खाते आहे. त्या खात्यावर ४ लाख १५ हजार रुपयांची रक्कम होती. २९ आॅक्टोबर रोजी प्रभाकर पवार हे घरी असताना खात्यावरील शिल्लक रक्कम पाहण्यासाठी त्यांनी मोबाईलमधील बँकेचे अॅप्लिकेशन सुरू केले. त्यावेळी अॅप्लिकेशनचा पासवर्ड बदलण्याबाबत त्यांना मेसेज दिसला. त्यांनी तो मेसेज उघडला असता त्यामध्ये एक मोबाईल क्रमांक होता. पवार यांनी त्या क्रमांकावर स्पर्श केला असता काही मिनिटात त्यांना संबंधित क्रमांकावरुन फोन आला. तुमच्या मोबाईलमधील अॅप्लिकेशन बंद पडले असून ते सुरू करायचे असल्यास तुमच्या खात्याची माहिती द्या, असे संबंधिताने सांगीतले.
त्यानंतर पवार यांनीही सदरची माहिती मेसेजद्वारे संबंधिताला पाठविली. मात्र, शंका आल्यामुळे दुसऱ्या दिवशी त्यांनी एटीएममध्ये जाऊन खात्यावरील शिल्लक रक्कम तपासली असता खात्यातून १ लाख ३८ हजार ५७१ रुपये काढण्यात आल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यामुळे त्यांनी याबाबत कराड ग्रामीण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञातावर गुन्हा नोंद करण्यात आला आहे. याप्रकरणी अधिक तपास कराड ग्रामीण पोलीस करीत आहेत.