सध्या दिवाळी सणाच्या खरेदीसाठी बाजारपेठेत मोठ्या प्रमाणावर गर्दी होत आहे. त्यामुळे यामध्ये दुकानदार, व्यापाऱ्यांनी ५० मायक्रोन पेक्षा कमी प्रतीच्या प्लास्टिकचा वापर करू नये, अशा सूचना नगरपालिकेच्या आरोग्य विभागाच्या पथकाकडून देण्यात आल्या आहेत. तसेच अशा प्लास्टिकची विक्रीही करण्यावर बंदी घालण्यात आली आहे.
कराड : येथील नगरपालिकेच्या वतीने माझी वसुंधरा अभियान आणि "स्वच्छ सर्वेक्षण 2022" अंतर्गत सिंगल युज प्लास्टिक आणि 6 कंपार्टमेंट याबाबत नागरिक व दुकानदार, व्यापाऱ्यांचे प्रबोधन केले जात आहे. ५० मायक्रोन पेक्षा कमी प्रतीच्या प्लास्टिकचा वापर टाळा, अशा सूचना देत त्याचे उल्लंघन केल्यास संबंधितांवर दंडात्मक कारवाई करण्यात येणार असल्याचा इशाराही देण्यात आला आहे.
सध्या दिवाळी सणाच्या खरेदीसाठी बाजारपेठेत मोठ्या प्रमाणावर गर्दी होत आहे. त्यामुळे यामध्ये दुकानदार, व्यापाऱ्यांनी ५० मायक्रोन पेक्षा कमी प्रतीच्या प्लास्टिकचा वापर करू नये, अशा सूचना नगरपालिकेच्या आरोग्य विभागाच्या पथकाकडून देण्यात आल्या आहेत. तसेच अशा प्लास्टिकची विक्रीही करण्यावर बंदी घालण्यात आली आहे.
त्याचबरोबर सदर पथकाकडून सोमवारी बाजारपेठेतील दुकानदार आणि व्यापाऱ्यांना प्लास्टिक पिशव्यांवर महाराष्ट्र पर्यावरण नियंत्रण बोर्ड (एम.पी.सी.टी.) यांचा अधिकृत नंबर असल्याशिवाय कोणत्याही प्लास्टिकची विक्री व वापर करता येणार असल्याचेही बजावण्यात आले आहे.
त्याचबरोबर बाजारपेठेतील अनेक दुकानदार व व्यापाऱ्यांकडे सध्या विक्री व वापरासाठी असलेल्या प्लास्टिक पिशव्यांची तपासणी करून त्या ५० मायक्रोन पेक्षा कमी प्रतीच्या आहेत का? तसेच त्यावर महाराष्ट्र पर्यावरण नियंत्रण बोर्ड (एम.पी.सी.टी.) यांचा अधिकृत नंबर आहे का? याचीही खात्री करण्यात आली. परंतु, त्यामध्ये कोणीही सदर नियमाचे उल्लंघन केल्याचे निदर्शनास आले नसल्याची माहिती आरोग्य विभागाच्या पथकाकडून देण्यात आली.
तसेच यापुढेही पालिकेकडून सदर मोहीम राबवण्यात येणार असून त्यामध्ये कोणी दोषी आढळल्यास संबंधितांवर नगरपालिकेकडून दंडात्मक कारवाई करण्यात येणार असल्याचेही आरोग्य पथकाकडून सांगण्यात आले आहे.