कराड : वहागाव-बेलवडे हवेली ता. कराड गावच्या हद्दीत पुणे-बेंगलोर महामार्गावर आयशर, ट्रक आणि कारचा तिहेरी अपघात घडल्याची घटना घडली. समोरील कारने अचानक ब्रेक मारल्याने पाठीमागून आलेल्या आयशरने कारला व आयशरला त्यापाठीमागे असलेल्या ट्रकने धडक दिली. मंगळवारी सकाळी ११ वाजता झालेल्या या अपघातात ट्रक चालक गंभीर जखमी झाला आहे.
याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की, पुणे-बेंगलोर महामार्गावर वहागाव-बेलवडे हवेली गावच्या हद्दीत मंगळवारी सकाळी सातारा ते कोल्हापूर लेनवर समोरील वॅगनर कारने अचानक ब्रेक मारल्याने अपघातग्रस्त कार चालकानेही प्रसंगावधान दाखवत तात्काळ ब्रेक मारला. परंतु, कारच्या पाठीमागून आलेल्या आयशरने कारला धडक दिली. दरम्यान, या आयशरलाही त्यापाठीमागून आलेल्या ट्रकनेची जोरदार धडक बसली. त्यामुळे झालेल्या अपघातात कार, आयशर आणि ट्रकचेही नुकसान झाले आहे. तसेच ट्रक चालक गंभीर जखमी झाला असून त्याला तात्काळ उपचारासाठी खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दरम्यान, घटनास्थळावरून वॅगनर कार चालकाने पोबारा केला.
या अपघाताची माहिती मिळताच हायवे हेल्पलाइन पेट्रोलिंग इन्चार्ज दस्तगीर आगा, सिकंदर उघडे यांच्यासह महामार्ग पोलिस व तडबिड पोलिस ठाण्याच्या कर्मचाऱ्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. तसेच अपघातात ट्रकमध्येच अडकून पडलेल्या जखमी चालकास बाहेर काढून तात्काळ रुग्णवाहिकेतून उपचारासाठी रुग्णालयात पाठवले.
दरम्यान, अपघातानंतर तिन्ही अपघातग्रस्त वाहने महामार्गावर उभी होती. त्यामुळे काही काळ याठिकाणी वाहतूक कोंडी झाली होती. त्यांनतर अपघातग्रस्त वाहने बाजूला करून वाहतूक सुरळीत करण्यात आली. अपघाताची नोंद तडबिड पोलिस ठाण्यात झाली आहे.