प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत मलकापूर नगरपालिकेने आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकांना वैयक्तिक घरकुलांसाठी निधीची मागणी केली होती. त्यानुसार मंजूर 203 पैकी 112 घरकुलांसाठी केंद्र शासनाकडून 55.20 लाख रुपयांचा पहिला हप्ता प्राप्त झाला. मात्र, उर्वरित 249.30 लाख रुपयांचा निधी मिळाला नसल्याने लाभार्थींच्या घरकुलांची कामे अपुर्ण राहिली आहे.
कराड : प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत मलकापूर नगरपालिकेने आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकांना वैयक्तिक घरकुलांसाठी निधीची मागणी केली होती. त्यानुसार मंजूर 203 पैकी 112 घरकुलांसाठी केंद्र शासनाकडून 55.20 लाख रुपयांचा पहिला हप्ता प्राप्त झाला. मात्र, उर्वरित 249.30 लाख रुपयांचा निधी मिळाला नसल्याने लाभार्थींच्या घरकुलांची कामे अपुर्ण राहिली आहे. याबाबत राज्यमंत्री गृह (शहरी), गृहनिर्माण, माहिती तंत्रज्ञान, वाहतूक व संसदीय कार्य मंत्री सतेज उर्फ बंटी पाटील यांची भेट घेऊन त्यांना निधी देण्याबाबतच्या सूचना गृहनिर्माण विभागाला करण्याची विनंती केली. त्यानुसार दिवाळीनंतर त्यांनी विशेष बैठकीचे आयोजन करण्याच्या सुचना मुख्य अभियंता यांना दिल्या असल्याची माहिती मलकापूर नगरपालिकेचे उपनगराध्यक्ष मनोहर शिंदे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे.
या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे की, मलकापूर नगरपालिकेने प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत 203 घरकुलांचा प्रस्ताव केंद्र शासनाकडे पाठवला होता. त्याला केंद्रीय सनियंत्रण व मंजुर समितीने मान्यता दिलेली असून यापैकी बहुतांश घरकुलांची कामे सुरु आहेत. सदरचे घरकुल बांधण्यासाठी 2.50 लाख अंदाजपत्रकीय खर्च असून यापैकी केंद्र शासनाकडून 1.50 लाख व राज्य शासनाकडून 1 लाख निधीची तरतुद करण्यात आली आहे. त्यापैकी राज्य शासनाकडून त्यांच्या हिस्स्याची प्रती घरकुल 1 लाखाप्रमाणे 2 कोटी 3 लाख निधी प्राप्त झाला असून काम सुरु असणाऱ्या घरकुल लाभार्थींना सदरची रक्कम अदा करण्यात आली आहे.
मात्र, केंद्र शासनाकडून 203 मंजुर घरकुलापैकी 112 घरकुलांसाठी पहिला हप्त्याची 55.20 लाखाचा निधी प्राप्त झाला असून उर्वरित 249.30 लाख निधी प्राप्त झालेला नाही. त्यामुळे निधीअभावी लाभार्थींच्या घरकुलांची कामे अपुर्ण असल्याने त्यांना आर्थिक अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. तसेच मलकापूर नगरपालिकेने घटक क्र. 4 अंतर्गत नव्याने सादर केलेल्या 71 घरकुलांचा प्रस्ताव 24 डिसेंबर 2020 रोजी म्हाडाकडे सादर केला होता. तो अद्याप प्रलंबित आहे.
या सर्व बाबींचा विचार करता राज्यमंत्री गृह (शहरी), गृहनिर्माण, माहिती तंत्रज्ञान, वाहतूक व संसदीय कार्य मंत्री सतेज उर्फ बंटी पाटील याची प्रत्यक्ष भेट घेऊन केंद्र शासनाचा उर्वरित निधी, तसेच घटक क्र.4 अंतर्गत सादर केलेल्या प्रस्तावास लवकरात लवकर मान्यता देण्यासाठी गृहनिर्माण विभागाचे मुख्य अभियंता यांना सुचना देण्याबाबतची विनंती केली. त्यानुसार मंत्री सतेज उर्फ बंटी पाटील यांनी दिवाळीनंतर मलकापूर नगरपरिषदेच्या कार्यक्षेत्रातील घरकुलांना केंद्र शासनाचा निधी मिळण्यासाठी विशेष बैठकीचे आयोजन करण्याच्या सुचना मुख्य अभियंता यांना दिल्या आहेत.
त्यामुळे या बैठकीनंतर केंद्र शासनाचा निधी लवकरात लवकर प्राप्त होऊन मलकापूर नगरपालिका कार्यक्षेत्रातील अपुर्ण राहिलेल्या घरकुलांचे काम पुर्ण होण्यास मदत होणार असल्याचेही मनोहर शिंदे यांनी या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.