सचिन मोरे, फलटण
फलटण येथील ज्येष्ठ, हरहुन्नरी, आनंदी कवी अशोकराज दीक्षित. विविध कवी संमेलनांमधून कवी अशोकराज दीक्षित यांनी कवी मनाची छाप आपल्या काव्यांद्वारे उमटवली होती. तर हळव्या मनाचा सामाजिक कार्यकर्ता म्हणूनते सर्वांना परिचित होते. त्यांचे आज बलिप्रतिपदा (पाडवा ) तिसरे पुण्यस्मरण. त्यानिमित्ताने त्यांच्या कार्यकर्तृत्वाचा हा अल्पसा आढावा....
फलटण येथील महात्मा फुले संस्था संचालित, मतिमंद व मूकबधिर मुलांची शाळा फलटण येथे अशोकराज दीक्षित यांनी संगीत शिक्षक म्हणून सेवा बजावली. मूळचे उरुळी कांचन येथील मात्र फलटण हेच त्यांची कर्मभूमी राहिली.
कवि अशोकराज दीक्षित यांच्याकडे निसर्गदत्त आवाजाची देणगी होती. कोणत्याही कार्यक्रमात कधीही मानापानाची अपेक्षा न ठेवता ते श्रोत्याच्या भूमिकेत सहज कवी रमून जायचे. कवीता सादर करताना श्रोत्यांच्या हृदयाचा ठाव ते अचूक घ्यायचे. हळव्या मनाचा, शांत स्वभावाचा, चेहऱ्यावर नेहमी हास्य असणाऱ्या आगळ्यावेगळा कवी म्हणजे अशोकराज दीक्षित.
अशोकराज दीक्षित हे अनेक नवकवींचे प्रेरणास्त्रोत होते. रुबाबदार पेहराव, भारदस्त मिशी, चेहऱ्यावर हास्य व कवीतेतील मिश्किली श्रोत्यांना विशेष भावत असे. 'डोक्यावर गोल टोपी व भारदस्त मिशी' ही त्यांची स्वतंत्र ओळख होती. त्यांनी अनेक कवी, साहित्य संमेलने आयोजित केली. त्यांच्या मिशी, वार्धक्यातील प्रेम, प्रियसी ते पत्नी, जीवन, कविता, भिशी अदी कवितांनी रसिकांना वेड लावले होते. अशोकराज दीक्षित यांच्या काव्यात हळूवारता होती. शब्दा शब्दात ते व्यक्त होत तेव्हा त्यांच्या काव्य रचनेतील प्रगल्भता जाणवू लागे.
अशोकराज दीक्षित हे बहुआयामी कर्तृत्त्वाने नटलेले व्यक्तीमत्त्व होते. कवी, लेखक, पत्रकार, समीक्षक, संगीततज्ज्ञ, सामाजिक बांधिलकी जपणारा कार्यकर्ता अशा अनेक पैलू असणारे ते एक अवलिया होते, असं म्हटलं तर वावग ठरणार नाही. आनंदी, उत्साही, सर्वांशी स्नेहाने वागणारे व्यक्तीमत्त्व हीच त्यांची खास ओळख होती.
कवी म्हणून अशोकराज दीक्षित यांची विशेष ओळख असताना ते हळव्या मनाचा सामाजिक कार्यकर्ता म्हणून सर्वांना परिचित होते. असंघटित कामगारांना संघटनात्मक बांधणीतून त्यांच्या उज्वल भविष्यासाठी अशोकराज दीक्षित यांनी अनेक वर्ष काम केले. गरीब कुटुंबातील मुलांनी शिक्षण घ्यावे यासाठी सातत्याने ते काम करीत राहिले. माणूस हिच जात म्हणून अशोकराज दीक्षित जातपात विरहित काम करीत. लोकनेते माजी खासदार कै. हिंदुराव नाईक- निंबाळकर यांचा आश्रय व आशिर्वाद अशोकराज दीक्षित यांना कायमच लाभला.
अशा या काव्य रसिकांच्या मनावर अक्षरशः अधिराज्य गाजविणारे व समाज मनावर आपली करायची छाप कायमची सोडणारे कविराज अशोकराज दीक्षित यांना विनम्र अभिवादन...