फलटण, प्रतिनिधी दि. 20 : काश्मिर खोऱ्यातील लेह लडाख येथे कर्तव्यावर असताना झालेल्या अपघातात 9 सैनिक ठार झाले असून यामध्ये सातारा जिल्ह्यातील फलटण तालुक्यातील राजाळे गावचे सुपुत्र वैभव संपतराव भोईटे हे शहीद झाले आहेत. या घटनेचे वृत्त कळताच राजाळे गावासह परिसरावर शोककळा पसरली आहे.
याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी, शनिवारी संध्याकाळी लेहमधील न्योमा भागातील कियारी येथे लष्कराचे वाहन रस्त्यावरुन घसरुन खोल दरीत कोसळले. या वाहनात कर्तव्यावर निघालेले जवान होते. या दुर्घटनेत 9 जवानांसह एका ज्युनियर कमिशन्ड ऑफिसरचा (जेसीओ) मृत्यू झाला आणि एक जण जखमी झाले आहेत. ही घटना कळताच लष्कराकडून तातडीने बचाव कार्य सुरु करण्यात आले होते. मात्र या घटनेत 8 जवानांचा जागीच मृत्यू झाला होता. तर दोघेजण जखमी झाले आहे. दोघा जखमींना रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले. उपचार सुरु असताना त्यातील एका जवानाचा मृत्यू झाला आहे.
या दुर्घटनेत राजाळे येथील वीरजवान वैभव भोईटे यांचा समावेश असल्याचे वृत्त गावकऱ्यांना कळाले. देशासाठी आपल्या गावचा वीर शहीद झाल्याच्या अभिमानाने सर्वांची छाती अभिमानाने भरुन गेली. मात्र, सुपुत्र गमावल्याचे दुःखही असल्याने राजाळे गावावर शोककळा पसरली आहे. दरम्यान, शहीद जवान वैभव भोईटे यांचे पार्थिक गावी कधी येणार आहे याबाबत अधिकृत माहिती मिळू शकली नव्हती.