फलटण प्रतिनिधी : लेकरांच्या वाट्याला आता कष्ट नको. मराठ्यांचं बलिदान वाया जाऊ देणार नाही. मराठा समाजाला आरक्षण ही एकच मागणी आमची आहे. आरक्षण नाही म्हणून आम्हाला नोकऱ्या लागत नाहीत. मराठ्यांना आरक्षण म्हटलं की यांना कायदा, अभ्यास, समित्या लागतात. मात्र आता सरकारला दिलेला वेळ संपला आहे. आता सुट्टी नाही असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला दिला.
फलटण येथील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे आयोजित सभेत मनोज जरांगे पाटील बोलत होते. यावेळी प्रचंड मोठ्या प्रमाणावर मराठा समाज बांधव उपस्थित होते. यावेळी मनोज जरांगे पाटील म्हणाले, शांततेच युद्धच मराठा आरक्षण मिळवून देईल. २२ तारखेला सांगणार २४ तारखेनंतरचं आंदोलन कसं असणार. मला अजूनही आशा आहे की सरकार २४ तारीख उजडू देणार नाही. मराठा आरक्षणासाठी ५ हजार पानांचे पुरावे देणार आहे. १ पुरावा मिळाला काय १०० मिळाले काय कायदा पारित करण्यासाठी आधार लागतो. एका दिवसात कायदा पारित होतो. राज्यपालांची परवानगी गेऊन विधानसभा घेऊन सरकार कायदा पारित करु शकतो.
फलटणला एक ऐतिहासिक असा इतिहास आहे. फलटणला सुरू केलेला लढा कधीही अयशस्वी झाला नाही. आज फलटणमध्ये एवढी अलोट गर्दी बघून मी भारावून गेलो आहे. मी खरं तर कमी बोलणार होतो पण आता एवढी अलोट गर्दी बघून मी सगळंच बोलणार आहे. कोणता मतदारसंघ कुणाचा बालेकिल्ला आहे; हे आता महत्त्वाचे नाही आता आधी आमचे बालेकिल्ला मजबूत ठेवा तरच तुमचा बालेकिल्ला शाबूत ठेवणार; असे म्हणत जरांगे पाटील यांनी सरकारकडे विशेष अधिवेशन घेऊन मराठा आरक्षण द्यावे, अशी मागणी केली.
मनोज जरांगे पाटील म्हणाले, आता आरक्षण घ्यायचं.आता कायदा पारित करायचा आहे. समितीला पाच हजार पुरावे मिळाले आहेत. मराठा कुणबी आहे त्यामुळे आता राज्यातील सर्व मराठ्यांना सरसकट ओबीसी प्रमाणपत्र द्यावे. आम्हाला आडमुठी भुमिका घ्यायची नाही. आडमुठी भुमिका घ्यायची असती तर ४ दिवसांच्या मुदतीवर ठाम राहिलो असतो. ४० दिवसांची मुदत दीली नसती, २४ तारखेपर्यंत कोणालाच काही बोलायचे नाही. सरकारने ठरवले आहे, मराठ्यांनाच मराठ्यांच्या अंगावर सोडायचे. त्यामुळे आता शांत राहायचं. २४ तारखेपंर्यत कोणालाच काही उत्तर द्यायचे नाही. वातावरण दुषित करण्याचा सरकारचा प्रयत्न सुरु आहे असेही मनोज जरांगे पाटील यांनी स्पष्ट केले.
आरक्षणाचा निर्णय मुदतीपूर्वी घ्या अशी आग्रही मागणी केली. मराठा आरक्षणाबाबत कायदा पारित केल्यानंतर त्यामध्ये पुन्हा अडचणी येवू नयेत यासाठी आम्ही सरकारला ४० दिवसांचा वेळ दिला. आता सरकारने २४ तारखेला आदेश पारीत करून आरक्षण द्यावं.अन्यथा आम्ही तुमच्या छाताडावर बसून आरक्षण घेऊ, शांततेच्या मार्गाने आंदोलन करत सरकारला मराठा आरक्षण निर्णयापर्यंत आणलं आहे. परंतु २४ ऑक्टोबरनंतर हे शांततेचं युद्ध सरकारला झेपणार नाही आणि पेलणारही नाही, मराठा समाजाने ताकदीने तयारी करा,गाफील राहू नका. आपण छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे आहोत. शिवाजी महाराजांचा एकही मावळा गाफील राहत नव्हता. त्यामुळे आता सर्वांनी एकजुटीने लढा देण्याचा निर्धार करा.मराठा आरक्षणासाठी सरकारने आमच्याकडे वेळ मागितला म्हणून आम्ही ४० दिवसांची मुदत दिली. येत्या २४ तारखेला ही मुदत संपणार आहे. तत्पूर्वी २२ ऑक्टोबर रोजी आपण या आंदोलनाची पुढील दिशा जाहीर करू अशी घोषणा मनोज जरांगे पाटील यांनी केली आहे. त्याचवेळी मी माझ्या समाजाशी प्रामाणिक असून आरक्षण मिळेपर्यंत एक इंचही मागे हटणार नाही असेही मनोज जरांगे पाटील यांनी यावेळी जाहीर केले.
मनोज जरांगे पाटील यांच्या सभेच्या ठिकाणी फलटण तालुका मुस्लीम समाजाच्या वतिने सभेसाठी आलेल्या नागरिकांना मोफत पाण्याच्या बोटलचे वाटप करण्यात आले.