फलटण प्रतिनिधी : फलटण अधिकारगृह परिसरातील संडास, मूतारीमध्ये घाणीचे साम्राज्य असल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. या परिसरातील संडास, मुतारीचा वापर सर्वसामान्य नागरिक किंवा कार्यालय कर्मचारी सध्या तरी करूच शकत नाही इतकी घाण पसरलेली आहे. तर या संडासमध्ये पाण्याचीही व्यवस्था नाही. तालुक्यातील नागरिक विविध कामानिमित्त तहसील कार्यालय येथे येतात. त्यांना कामासाठी चकरा माराव्या लागतात.
फलटण अधिकारगृह परीसरात तहसील कार्यालय, उपविभागीय अधिकारी कार्यालय व बांधकाम विभाग कार्यालय, दुय्यम निबंधक कार्यालय, निरा उजवा कार्यालय, सिटीसर्वे कार्यालय तसेच नव्यानेच सुरु झालेले जिल्हा सत्र न्यायालय आहे. या ठिकाणी फलटण तालुक्यातील शेकडो लोकांनाची दररोज ये-जा असते. प्रसंगी अनेकांना दिवसभर कामानिमित्त येथे थांबावे लागते. यामध्ये वयोवृद्धांसह महिलांसाठी मोठा सहभाग असतो. या सर्वांनाच संडास, मूतारीमध्ये घाणीचे साम्राज्य असल्याने मोठया समस्येला तोंड द्यावे लागत आहे.
कर्मचारी व सामान्य नागरिकांची शौचालय, मुतारीत घाण असल्याने अडचण होत आहे. महिला, नागरिक व कर्मचाऱ्यांना शौचालय, लघुशंकेकरिता कुठे जावे हा प्रश्न त्यांच्या समोर आहे. एकीकडे स्वच्छता मोहीम राबविले जाते तर दुसरीकडे शासकीय कार्यालयातच घाणीचे साम्राज्य असल्याने याकडे गंभीर दखल घेऊन स्वच्छता ठेवण्यास व मुबलक पण्याची व्यवस्था करावी अशी मागणी फलटण तालुकावासीयांनी केली आहे.