फलटण प्रतिनिधी :
तत्कालीन इस्ट इंडिया कंपनी व इंग्रज सरकार कंपनी विरोधात 1831 साली घोषणापत्र काढून विद्रोह करणारे नरवीर उमाजी नाईक हे भारतीयांना स्वातंत्र्याची स्वप्ने दाखवणारे आद्यक्रांतिकारक होते, असे प्रतिपादन मुधोजी महाविद्यालय फलटण येथील मराठी विभाग प्रमुख प्राध्यापक डॉ. प्रभाकर पवार यांनी केले.
प्राचार्य डॉ.पंढरीनाथ कदम यांच्या अध्यक्षतेखाली मुधोजी महाविद्यालयाने आयोजित केलेल्या 'आद्यक्रांतिकारक नरवीर उमाजी नाईक जयंती कार्यक्रमात डॉ. प्रभाकर पवार प्रमुख वक्ते म्हणून बोलताना पुढे म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श व प्रभाव असणाऱ्या उमाजींना इंग्रज सरकारकडून रयतेचे होत असलेले हाल पाहवत नव्हते, दडपशाही, अत्याचाराने मनमानी कारभार करणाऱ्या इंग्रज सरकारविरोधात सशस्त्र लढा पुकारून आर्थिक नाकेबंदी केली, पण जवळच्याच माणसांच्या फंदफितुरीने उमाजींचा घात केला व ते इंग्रजांच्या हाताला लागले व अवघ्या एक्केचाळिसाव्या वर्षी त्यांना मृत्यूदंडाची शिक्षा झाली व एक देशभक्त आद्यक्रांतिकारक काळाच्या पडद्याआड गेला. अशा नरवीराच्या धाडसाचा आदर्श नव्या पिढीने घेऊन आजच्या समाजविघातक व देशद्रोही समस्यांना वाचा फोडली पाहिजे, असेही डॉ. प्रभाकर पवार यांनी सांगितले.
यावेळी आद्यक्रांतिकारक उमाजीराजे यांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून प्राचार्य डॉ. पंढरीनाथ कदम अभिवादन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. विशाल मोरे यांनी केले. कार्यक्रमाला माविद्यालयातील विभागप्रमुख, प्राद्यापक प्राध्यपिका, कर्मचारी वृंद व विध्यार्थी विद्यार्थिनी उपस्थित होते. सर्वानी प्रतिमेला पुष्प वाहून अभिवादन केले. शेवटी आभार मानून कार्यक्रमाचा समारोप झाला.