फलटण प्रतिनीधी:- सहा महिन्याकरिता तडीपार असणाऱ्या गुंड मोन्या निंभोरे याला पाठलाग करून अटक केली असून त्याच्यावर सरकारी कामात अडथळा आणल्या प्रकरणी व महाराष्ट्र पोलिस कायदा कलम १४२ प्रमाणे कारवाई करण्यात आली आहे.
फलटण ग्रामीण पोलिस ठाण्यातून मिळालेल्या माहितीनुसार, साखरवाडी ता फलटण भागातील नामची गुंड मोन्या उर्फ राकेश रमेश निंभोरे (रा. सात सर्कल) यांच्यावर शरीराविरुद्ध व मालमत्तेविरुद्धचे अनेक गुन्हे असल्याने व तो खुनाचे गुन्ह्यातून बाहेर आल्याने त्याची साखरवाडी भागामध्ये दहशत आहे. साखरवाडी पंचक्रोशीतील गावांमध्ये लोक त्याला घाबरतात. त्यामुळे त्याला फलटण ग्रामीण पोलिसांनी एक महिन्यापूर्वी उपविभागीय अधिकारी फलटण यांचे आदेशन्वये सहा महिन्याकरिता पुणे सोलापूर सातारा जिल्हयातून तडीपार केले आहे.
लोकसभा निवडणूक उद्या आहे त्यामुळे पोलिस निरक्षक सुनील महाडीक, पोलिस हवालदार योगेश रणपिसे, अमोल जगदाळे व बंदोबस्त साठी आलेले प्रशिक्षणार्थी महिला पो.शी अश्विनी बागडे,भाग्यश्री पाटील हे साखरवाडी भागात गस्त करत असताना, आज दिनांक ६ मे रोजी तडीपार मोन्या निंभोरे व त्याचा साथीदार दत्ता सुरेश मोरे उर्फ दत्ता पावले (राहणार सात सर्कल) हे मोटरसायकल वरून जिंती होळ मार्गाने जाताना संध्याकाळी ६ वाजता त्यांना दिसले.
सदरचा गुंड तडीपार असल्याने त्याला थांबण्याचा इशारा पोलिसांनी केला असता त्याने पोलिसांच्या गाडीवर लाथ मारली. पोलिसांना अपशब्द वापरून पळू लागले त्यावेळी पोलिसांनी पाठलाग करून त्याना पकडले त्यावेळी त्या ठिकाणावरून दत्ता पावले पळून गेला. सदर ठिकाणावरून पोलिसांनी ते चालवत असलेली मोटरसायकल क्रमांक MH11AS 2711 ही पण जप्त केली.
मोन्या निंभोरे याला पोलिस ठाण्यात आणून त्या दोघांवर भा.द.वी कलम ३५३, ३४ सह तडीपारी आदेश भंग केला म्हणून महाराष्ट्र पोलिस कायदा कलम १४२ प्रमाणे कारवाई करण्यात आली आहे. सदर कारवाई पोलिस अधीक्षक समीर शेख, अप्पर पोलिस अधीक्षक अंचल दलाल, उविभागीय पोलिस अधिकारी राहुल धस यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली आहे. निवडणूक काळात सर्व तडीपार लोकांची यादी प्रत्येक पोलिस अधिकारी व कर्मचारी याना देण्यात आली आहे. तडीपार लोकांची आढळून आल्यास त्यांना अटक करण्यात येणार आहे. जनतेने न घाबरता माहिती द्यावी असे आवाहन फलटण ग्रामीण पोलिस निरीक्षक सुनील महाडिक यांनी केले आहे.