धैर्य टाईम्स : सचिन मोरे
उकाड्यामुळे अंगाची लाही होत असताना दिवसा आणि रात्रीही वीज पुरवठा खंडीत होण्याचे प्रकार होऊ लागल्याने फलटण आणि आसपासच्या परिसरातील रहिवासी हैराण झाले आहेत. केवळ फलटणच नाही तर तालुक्यातील रहिवाशांना हाच अनुभव येत आहे. मात्र हा प्रकार म्हणजे लोडशेडिंग नसून, ट्रान्सफॉर्मरच्या क्षमतेहून अधिक मागणी झाल्यावर वीज पुरवठा ट्रीप होत असल्याने वीज खंडीत होत असल्याचे महावितरणच्या सूत्रांचे म्हणणे आहे.
तापमानात वाढ होत असून, कमाल तापमान ३३.२ अंश, तर किमान ३६. ८ अंश इतके नोंदवले गेले. हवेतील आर्द्रतेच्या प्रमाणामुळे तापमान चाळीशीखाली असूनही उन्हाच्या झळा तीव्रतेने जाणवत आहेत. उकाड्यामुळे बहुतांश ऑफिस व घरांमध्ये एसी, कुलर आणि पंख्यांचा वापर वाढला आहे. वीज वापराचे प्रमाण बरेच वाढल्याने ट्रान्सफॉर्मरवर ताण येतो आणि तेथील यंत्रणा नादुरुस्त होऊ नये, यासाठी वीजपुरवठा आपोआप खंडित होतो. परंतु असे प्रकार दिवसभरात केव्हाही आणि सातत्याने होऊ लागल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. दिवसातून २ ते ४ वेळा वीज पुरवठा खंडीत होण्याचा प्रकार अनुभवायला मिळत असल्याचे फलटण येथील अनेकांनी सांगितले. महावितणरच्या अधिकाऱ्यांना विचारणा केली असता ते केवळ ट्रान्सफॉर्मरमध्ये बिघाड असल्याचे ठोकळेबाज उत्तर देतात, अशी तक्रार विज ग्राहकांनी केली. विज खंडीत वीजपुरवठ्याचे प्रकार नित्याचेच झाले आहेत. फलटण तालुक्यात पूर्वसूचना न देता कधीही वीज जाण्याच्या प्रकाराबाबात अनेकांनी संताप व्यक्त केला.
हे लोडशेडिंग नव्हे…
दरम्यान याबाबत महावितणरच्या सूत्रांना विचारणा केली असता, त्यांनी वीज पुरवठा खंडीत झाल्याच्या तक्रारी येत असल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला. मात्र हे लोडशेडिंग नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. वीज पुरवठा खंडीत झाला की तो पुन्हा सुरळीत करण्यासाठी महावितरणच्या कर्मचाऱ्यांना संबंधित ट्रान्सफॉर्मरपर्यंत जावे लागते. त्यामुळे वीज पुरवठा पुन्हा पूर्ववत होण्यात वेळ लागतोव
वसुली करताना असलेली तत्परता विज खंडित झाल्यावर दाखवावी
फलटण शहराबरोबर तालुक्यातील अनेक थकित वीज ग्राहकांचा वीज पुरवठा खंडित करताना जी तत्परता अधिकारी दाखवतात तीच तत्परता वीज खंडित झाल्यानंतर अधिकारी दाखवावी अशी मागणी वीज ग्राहक करू लागले आहेत.
31 मार्चच्या समाप्तीनंतर अनेक अधिकारी ऐच्छिक सक्तीच्या विश्रांतीवर गेले असल्याचे कर्मचाऱ्यांनी सांगितले. त्यामुळे अनेक ठिकाणी वीजपुरवठा खंडित झाला तरीही अधिकारी उपस्थित नसल्याने फलटण तालुक्यातील वीज ग्राहकांना मोठ्या समस्येला सामोरे जावे लागत आहे.