फलटण प्रतिनीधी :- फलटण शहर पोलीस ठाण्यात अनेक गुन्हे दाखल असणाऱ्या एका सराईत गुन्हेगारास दोन वर्षासाठी हद्दपार करण्यात आले आहे
फलटण शहर पोलिस ठाण्यातून मिळालेल्या माहितीनुसार, सन २०२० पासुन संजय ज्ञानदेव पवार (रा. दत्तनगर फलटण, ता. फलटण, जि. सातारा) याच्या विरुध्द फलटण शहर पोलीस ठाण्यात येथे चोरी करणे, लोकसेवकास त्याचे कर्तव्य पार पाडण्यापासुन धाकाने परावृत्त करणे, दमदाटी करणे, महिलेचा विनयभंग उद्देशाने कृती करणे, बेकायदेशीर जमाव जमवून दंगा करणे, मारहाण करणे इत्यादी गुन्हेगारी गुन्हे दाखल आहेत. संजय ज्ञानदेव पवार याच्या गुन्हेगारी प्रवृत्तीस आळा घालण्यासाठी या पुर्वी फलटण शहर पोलीसांनी प्रतिबंध कारवाई केली होती. तरीही त्याने त्याची गुन्हेगारी कृत्ये सुरु ठेवली होती. त्यामुळे फलटण शहर पोलीस ठाण्याने उपविभागीय दडाधिकारी, फलटण यांच्याकडे कलम ५६(१) (अ) (ब) महाराष्ट्र पोलीस अधिनियमान्वये त्यास हद्दपार करण्याबाबत प्रस्ताव सादर केला होता. या अनुषंगाने चौकशीअंती उपविभागीय दडाधिकारी, फलटण यांनी संजय ज्ञानदेव पवार (रा. दत्तनगर फलटण, ता. फलटण, जि. सातारा) यास संपूर्ण सातारा जिल्हा, पुणे जिल्हयातील बारामती व पुरंदर तालुका व सोलापूर जिल्हयातील माळसिरस तालुका येथून दोन वर्षाकरिता हद्दपार करण्याचे आदेश निर्गमित केले आहे. सदर आदेशाची संजय ज्ञानदेव पवार याच्यावर बजावणी करुन त्यास हद्दपार करण्यात आले आहे.
पोलीस अधीक्षक समीर शेख, अपर पोलीस अधीक्षक श्रीमती आँचल दलाल, उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल धस यांच्या मार्गदर्शनाखाली सदरची कारवाई सपोनि. नितीन शिंदे, पोउपनि, सुरज शिंदे, स.पो. फी. संतोष कदम, पोह. बापूराव धायगुडे, सचिन जगताप, पोशि. काकासो कर्णे, स्वप्नील खराडे, सचिन पाटोळे यांनी या कारवाईस सहभाग घेतला होता.