कराड तालुक्यातील प्रयोगशाळेत पाठवलेल्या २९३ स्त्रोतांपैकी ११ पाणीनमुने दूषित आढळले आहेत. सर्वच्या सर्व ११ दुषित पाणीनमुने हातपंपांचे आहे. त्यामुळे संबंधित ग्रामपंचायतींना काळजी घेण्याच्या सुचना करण्यात आल्याची माहिती आरोग्य विभागाच्या वतीने देण्यात आली.
कराड : कराड तालुक्यातील प्रयोगशाळेत पाठवलेल्या २९३ स्त्रोतांपैकी ११ पाणीनमुने दूषित आढळले आहेत. सर्वच्या सर्व ११ दुषित पाणीनमुने हातपंपांचे आहे. त्यामुळे संबंधित ग्रामपंचायतींना काळजी घेण्याच्या सुचना करण्यात आल्याची माहिती आरोग्य विभागाच्या वतीने देण्यात आली.
येथील पंचायत समितीच्या सभागृहात गुरुवारी ९ रोजी पंचायत समितीची मासिक सभा पार पडली. सभेच्या अध्यक्षस्थानी सभापती प्रणव ताटे होते. उपसभापती रमेश देशमुख, गटविकास अधिकारी शशिकांत शिंदे यांची प्रमुख उपस्थिती होती.
पंचायत समितीच्या मासिक सभेत विविध विषयांच्या विभागप्रमुखांनी आढावा सादर केला. त्यामध्ये आरोग्य विभागाचा आढावा तालुका आरोग्य अधिकारी डॉ. सुनिल कोरबू यांनी दिला. तालुक्यातील २९३ पिण्याच्या पाण्याच्या स्त्रोतांचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. त्यापैकी ११ हातपंपांचे नमुने दुषित आले आहेत. त्यनुसार संबंधित ग्रामपंचायतींना त्याबाबत कळविण्यात आल्याचे असून आवश्यक खबरदारी घेण्याबाबत सूचना करण्यात आल्या असल्याचे त्यांनी सांगितले. तालुक्यात कोरोना प्रतिबंधक लसीकरणाचा दुसरा डोस देण्याची प्रक्रिया गतीमान करण्यात आली आहे. या मोहिमेत सर्व नागरिकांनीही लसीचा दुसरा डोस घ्यावा. त्यासाठी ग्रामस्थ, नागरिकांना पंचायत समिती सदस्य, ग्रामपंचायती व स्थानिक लोकप्रतिनिधींनीही प्रेरित करुन आरोग्य विभागाला सहकार्य करावे, असे आवाहन गटविकास अधिकारी शशिकांत शिंदे यांनी केले.
शिक्षण विभागाच्या आढाव्यात गरजू मुलांना शालेय गणवेश मिळण्यासाठी ग्रामपंचायतींना निधीची तरतूद करता येते का? असा सवाल सदस्य रमेश चव्हाण यांनी उपस्थित केला. त्यावर संबंधितांना निधीची तरतूद असून त्यामध्ये काहीही अडचण नसल्याचे स्पष्टीकरण गटविकास अधिकारी शिंदे यांनी दिले.
कृषी विभाग आढावा तालुका कृषी अधिकारी रियाज मुल्ला यांनी सादर केला. त्यामध्ये गोपिनाथ मुंडे अपघात विमा योजनेचे तालुक्यातील २४ शेतकऱ्यांचे प्रस्ताव कृषी विभागाने पाठविले होते. त्यामधील एक प्रस्ताव नामंजूर झाला असून ७ प्रस्ताव मंजूर झाले आहेत. तर उर्वरीत प्रस्ताव प्रतिक्षेत असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. तसेच कृषी यांत्रिकीकरण योजनेत प्राप्त झालेल्या २ हजार २०० अर्जांपैकी ६१४ जणांना लॉटरी लागली असून त्यांच्याकडून कागदपत्रांची पुर्तता व इतर प्रक्रिया सुरु असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
दरम्यान, शासकीय निकषामुळे अल्पभूधारक शेतकऱ्यांना बियाणे अनुदानाचा लाभ मिळत नाही. त्यामुळे १० गुंठे क्षेत्र असेल तरिही त्या शेतकऱ्यास बियाणे अनुदानाचा लाभ देण्यात यावा, असा ठराव सदस्य शरद पोळ यांनी मांडला.
सदस्य चंद्रकांत मदने यांनी ग्रामपंचायतीमध्ये सत्ताबदल होवून नवीन बॉडी अस्तित्त्वात आली. तरिही जुन्या बॉडीनेच केलेला विकास आराखडा राबवावा लागत आहे. त्यामुळे नव्या बॉडीकडे अनेक संकल्पना असतानाही त्यांना काही करता येत नसल्याचा मुद्दा उपस्थित केला. त्यावर कायदेशीर तरतुदीनुसार चालावे लागते. पाच वर्षाचा आराखडा एकदा तयार केला जातो आणि त्यामधून दरवर्षी करावयाची कामे हाती घेतली जातात, असे गटविकास अधिकारी शिंदे यांनी सांगितले. त्याचबरोबर असा कोठे विषय असल्यास जिल्हा परिषदेच्या सीईओ यांना पाठवून त्यांच्या मंजूरीनंतर सदरचा आराखडा बदलून घ्यावा लागेल, असेही शिंदे यांनी यावेळी स्पष्ट केले.