धैर्य टाईम्स | 27 एप्रिल 2025 |
छत्रपती शिवाजी महाराज यांची 395 जयंती ( परंपरेप्रमाणे ) मंगळवार 29 एप्रिल 2025 रोजी मोठ्या थाटामाटात साजरी होणार आहे. शिवजयंती निमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती फलटण तालुका छत्रपती शिवाजी महाराज जन्मोत्सव समितीच्या वतीने देण्यात आली.
सोमवार दिनांक 28 एप्रिल रोजी सायंकाळी आठ वाजून तीस मिनिटांनी महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध व्याख्याते प्रा. नितीन बानगुडे पाटील यांचे "छत्रपती संभाजी महाराजांची शौर्यगाथा शिवराज्याचा छावा" हे व्याख्यान छत्रपती शिवाजी महाराज चौक, फलटण या ठिकाणी होणार आहे.
मंगळवार दिनांक 29 एप्रिल रोजी सकाळी आठ वाजता बाईक रॅली निघणार आहे. ही रॅली माळजाई मंदिर परिसरातून सुरू होणार असून या रॅलीमध्ये तालुक्यातील युवक -युवती,महिला - पुरुषांनी मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
छत्रपती शिवाजी महाराज जन्मोत्सव समिती फलटण तालुका यांच्या वतीने 29 एप्रिल रोजी सायंकाळी 6 वाजता माळजाई मंदिर परिसरातून छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीच्या निमित्ताने निघणाऱ्या मिरवणुकीची जोरदार तयारी सुरु झाली आहे. शिवजयंती मिरवणुकी सोहळ्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्या आकर्षक चित्ररथांबरोबरच भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले, अहिल्यादेवी होळकर, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे, शूर जिवा महाले, यांच्यासह विविध महामानवांचे चित्ररथ फलटणच्या शिवजयंतीचे प्रमुख आकर्षण ठरणार आहेत. तर या मिरवणूकीत हत्ती, घोडे त्यावर शिवकालीन पोशावात युवक- युवती मिरवणुकीचे विशेष आकर्षण ठरणार आहेत. मिरवणुकीत ढोल-ताशे, लेझर शो आणि शिवकालीन पोशाखधारी कलाकारांचा समावेश असेल.
यंदाच्या शिवजयंती उत्सवाला भव्य स्वरूप देण्यात आले आहे. शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक, छत्रपती संभाजी महाराज स्मारक परिसर आणि गजानन चौक येथे ऐतिहासिक कमानी, भगवामय सजावट आणि अश्वारूढ पुतळ्यांनी शिवभक्तांना आकर्षित केले आहे. ग्रामीण-शहरी क्षेत्रातील विविध मंडळांनी गड-किल्ल्यांवरून शिवज्योत आणण्याची तयारीही केली आहे.