कराड विमानतळ परिसरात लागलेल्या निर्बंधामुळे स्थानिक नागरिकांध्ये तीव्र नाराजी आहे. त्यामुळे जनभावनेच्या मागणीचा विचार करून हे निर्बंध हटवावेत अशी मागणी खा.श्रीनिवास पाटील यांनी केंद्रीय नागरी हवाई वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य सिंदिया व केंद्रीय नागरी हवाई वाहतूक राज्यमंत्री जनरल (नि) व्ही.के.सिंग यांच्याकडे केली आहे.
कराड : कराड विमानतळ परिसरात लागलेल्या निर्बंधामुळे स्थानिक नागरिकांध्ये तीव्र नाराजी आहे. त्यामुळे जनभावनेच्या मागणीचा विचार करून हे निर्बंध हटवावेत अशी मागणी खा.श्रीनिवास पाटील यांनी केंद्रीय नागरी हवाई वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य सिंदिया व केंद्रीय नागरी हवाई वाहतूक राज्यमंत्री जनरल (नि) व्ही.के.सिंग यांच्याकडे केली आहे.
खा.श्रीनिवास पाटील हे सध्या दिल्ली येथे लोकसभेच्या हिवाळी अधिवेशासाठी उपस्थित आहेत. या दरम्यान त्यांनी कराड विमानतळ संदर्भातील प्रश्नावर मार्ग काढण्यासाठी केंद्रीय नागरी हवाई वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य सिंदिया व केंद्रीय नागरी हवाई वाहतूक राज्यमंत्री जनरल (नि) व्ही.के.सिंग यांना पत्र लिहले आहे.
खा.पाटील यांनी म्हटले आहे, कराड शहराच्या बाहेर सुमारे 3 ते 4 किमी अंतरावर सदरचे विनापरवाना असलेले छोटे विमानतळ आहे. हे विमानतळ हेलिकॉप्टर आणि लहान खाजगी विमानांसाठी क्वचित प्रसंगी वापरले जाते. त्यानुसार वर्षभरात सुमारे 15 ते 20 विमाने याठिकाणी येत असतात. मात्र विमानतळ आजूबाजूच्या 20 किमी परिसरात बांधकाम आणि वृक्षारोपणावर निर्बंध लादले गेले आहेत. नुकतेच महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीने सातारा जिल्हाधिकारी यांना निर्देश दिले आहेत की, कराड विमानतळापासून 20 किमीच्या परिघात कोणतेही बांधकाम किंवा वृक्षारोपण करण्यासाठी महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीकडून ना-हरकत प्रमाणपत्र घेणे बंधनकारक आहे.
कराड आणि शेजारील मलकापूर शहराच्या पालिका अधिकाऱ्यांना असे प्रमाणपत्र आवश्यक केले आहे. बांधकामे आणि वृक्षारोपणाची उंची आणि प्रकार याबाबत विशिष्ट आणि स्पष्ट अटींशिवाय या सूचना देण्यात आल्या आहेत. परंतु असे प्रमाणपत्र मिळवण्याची नेमकी प्रक्रियाही स्पष्ट केलेली नाही. परिणामी या दोन नगरपालिका शहरांमधील सर्व बांधकाम आणि विकास प्रक्रिया तसेच 20 किमी त्रिज्येच्या मोठ्या क्षेत्रातील संबधित कामे ठप्प झाली आहेत. कराड येथील क्रेडाई संस्था तसेच प्रकल्प बाधित नागरिक या अन्यायकारक आणि अस्पष्ट निर्बंधांबद्दल तक्रारी करत आहेत.
कराड विमानतळ हे छोटेसे विना परवाना असलेले विमानतळ आहे. त्याचा वापर फार कमी वेळा होत असल्याने याची दखल घेऊन एकतर लादलेली निर्बंध उठवण्याची किंवा किमान कोणत्या प्रकारची आणि कोणत्या उंचीपेक्षा जास्त बांधकामांना नाहरकत परवानगी आवश्यक आहे यासाठी स्पष्ट मार्गदर्शक तत्त्वे जारी करण्याची गरज आहे.
दरम्यान, संपूर्ण परिसराचा विकास ठप्प होऊन मनमानी पद्धतीने लादलेले निर्बंध व त्याच्या अस्पष्ट स्वरूपाबाबत परिसरात तीव्र नाराजी आहे. याबाबत जिल्हाधिकारी तसेच महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीचे उपाध्यक्ष व एम.डी. यांच्याकडेही दाद मागितली आहे. मात्र तरीदेखील आपण याची दखल घेऊन तातडीने लक्ष घालावे. संबंधित अधिकाऱ्यांना योग्य त्या सूचना करून याविषयी स्पष्ट निर्देशांसह नागरिकांना योग्य दिलासा देण्याचे निर्देश द्यावेत अशी मागणी खा.श्रीनिवास पाटील यांनी केली आहे.