शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर नगरपालिका शाळा क्र. १० जवळ संरक्षक भिंतीसाठी काढलेल्या खड्यात पडून एका ४ वर्षीय मुलाचा मृत्यू झाला. ही दुर्दैवी घटना बुधवारी ८ रोजी रात्री १० वाजण्याच्या सुमारास उजेडात आली.
कराड : शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर नगरपालिका शाळा क्र. १० जवळ संरक्षक भिंतीसाठी काढलेल्या खड्यात पडून एका ४ वर्षीय मुलाचा मृत्यू झाला. ही दुर्दैवी घटना बुधवारी ८ रोजी रात्री १० वाजण्याच्या सुमारास उजेडात आली. खड्ड्यात साचलेल्या पाण्यात बुडून सदर मुलाचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. विराट विजय चव्हाण (वय ४) रा. बुधवार पेठ, कराड असे खड्ड्यात पडून मृत झालेल्या लहान मुलाचे नाव आहे.
दरम्यान, मृत मुलाच्या नातेवाईकांनी कुटुंबियांसह रात्री शहर पोलीस ठाणे गाठले होते. त्यामुळे काही काळ तणाव निर्माण झाला होता. त्यामुळे सदर परिसरात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. गुरुवारी ९ रोजी सकाळी घटनेतील मृत मुलावर अंत्यसंस्कार करण्यात आले. तसेच सदर ठिकाणी बांधकाम करताना कोणतीही उपाययोजना न केल्याने सबंधित मूलाच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी मुख्य ठेकेदार सत्यजितसिंह जगताप वडगाव हवेली ता. कराड व सहठेकेदार समीर पटवेगार व खाजा अमीन सत्तार मडकी दोघेही रा. कराड यांच्यावर शहर पोलीस ठाण्यात गून्हे दाखल करुन त्यांना अटक करण्यात आली आहे.
याबाबत घटनास्थळावरुन व पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, शहरातील बुधवार पेठेत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर नगरपालिका शाळा क्र. १० च्या बाजूला सध्या संरक्षक भिंती उभारण्याचे काम सुरु होते. त्यासाठी सदर ठिकाणी मोठे खड्डे खणले आहेत. सध्या त्यामध्ये पाणी साचले आहे. दरम्यान, बुधवारी ८ रोजी सायंकाळी या परिसरात काही लहान मुले खेळत होती. थोड्या वेळाने त्यातील एक लहान मुलगा गायब असल्याचे निदर्शनास आले. त्यांनतर त्या मुलाच्या कुटुंबियांनी परिसरात शोघ घेतला. मात्र तो सापडला नाही. त्यानंतर काही वेळाने सदर परिसरात शाळा इमारतीच्या संरक्षक भिंतीसाठी खोदलेल्या खड्ड्यात पाहिले असता संबंधित लहान मुलगा खड्ड्यात साचलेल्या पाण्यात पडल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर त्याला तात्काळ खड्याबाहेर काढण्यात आले. परंतु, तो मृत झाला होता. याबाबत कुटूंबियांना समजल्यानंतर कुटुंबियांनी व नातेवाईकांनी आक्रोश केला. तसेच रात्रीच शहर पोलीस ठाण्यात धाव घेतली.
मृत मुलाच्या कुटुंबिय, नातेवाईकांनी संबंधित कामाच्या ठेकेदारावर कारवाई करण्याची मागणी केली. यावेळी परिसरात तणाव निर्माण झाला होता. याबाबत कायदेशीर कारवाई करण्याचे आश्वासन वरिष्ठ पोलीस निरिक्षक बी. आर. पाटील यांनी मृताच्या नातेवाईकांना दिल्यानंतर सर्वजण पोलीस ठाण्यातून परतले. त्यानंतर गुरुवारी सबंधित मूलाच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी मुख्य ठेकेदार सत्यजितसिंह जगताप व सहठेकेदार समीर पटवेगार व खाजा अमीन सत्तार मडकी यांच्यावर शहर पोलीस ठाण्यात गून्हे दाखल करुन त्यांना अटक करण्यात आली आहे.
पालकमंत्र्यांनी केले विराटच्या कुटुंबीयांचे सांत्वन
शहरात नगरपालिका शाळा नंबर 10 जवळ संरक्षण भिंत बांधण्यासाठी खणलेल्या खड्यात पडून लहान मुलाचा मृत्यू झाला आहे. मृत मुलाच्या कुटुंबियांनी पोलीस ठाण्यात धाव घेत संबंधित ठेकेदारावर गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी ठिय्या दिला. त्यानंतर पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी बुधवारी मध्यरात्री शहर पोलिस ठाण्यात जाऊन कुटुंबीयांचे सांत्वन केले. तसेच ठिय्या आंदोलन मागे घेण्याची विनंती करून याप्रकरणी पोलिसांना तपास करण्याच्या सूचना दिल्या.