कै.सुभाषराव नामदेवराव सूर्यवंशी (बेडके) उर्फ काका यांनी शिक्षणाच्या अनेक वाटा निर्माण करून विद्यार्थी हिताच्या दृष्टीने श्रीराम एज्युकेशन सोसायटी फलटणचा वटवृक्ष वाढविला. दिवंगत थोर साहित्यिक व विचारवंत यशवंतराव चव्हाण व सौ. वेणूताई चव्हाण यांचा सहवास लाभलेले काका जेव्हा आपले विचार व्यक्त करत तेव्हा त्यांचा सर्व क्षेत्रातील अभ्यास किती गाढा आहे त्याची प्रचिती येत असे. श्रीराम संकुलातील विद्यार्थ्यांची जडणघडण सुसंस्कृतच असावी आणि यासाठी संस्थेतील सर्व शिक्षकांनी प्रयत्नशील असावे एवढी माफक अपेक्षा करणारे काका राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक व धार्मिक क्षेत्रातही सक्रियपणे कार्यरत असत. नेहमी आनंदी, मनमिळाऊ, सुहास्य चेहऱ्यावर असणारे, स्पष्ट बोलणारे, सगळ्यांची आपुलकीने चौकशी करणारे व समस्या निवारण करणारे काका संकुलातील प्रत्येक व्यक्तीला हवेहवेसे वाटावे असे होते.
काका जसे विद्यार्थ्यांच्या हिताचा विचार करत असत, तसेच संकुलातील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांचीही आपुलकीने चौकशी करत असत. कुटुंब प्रमुख म्हणून प्रत्येकाची अडचण काकांना पूर्णपणे माहित असे. फक्त शिक्षकच नाही, तर त्याच्या घरातील व्यक्ती ही आजारी इत्यादी असेल तरी काका आपुलकीने विचारपूस करायचे. काकांच्या या प्रेमळ स्वभावामुळे श्रीराम एज्युकेशन सोसायटीच्या प्रत्येक कर्मचा-यांच्या मनात 'ही माझी सोसायटी आहे, आणि मला जे द्यायचे आहे ते उत्तमच द्यायचे आहे, ही भावना निर्माण होते. 9 ऑगस्ट 2024 ला काकांचे वर्ष श्राद्ध झाले. अतिशय सुंदर असे ह. भ. प. श्री. ऋषिकेश महाराज चोरगे, पुणे यांचे प्रवचन ठेवण्यात आले. यामध्ये गरुड पुराणाचा सार सांगण्यात आला. यावेळी अनेक प्रतिष्ठित व्यक्तींनी लावलेली हजेरी आणि 'न भूतो न भविष्यति' गर्दी बघून काकांनी जोडलेली माणसे आणि त्यांच्याविषयीची आदरभावना पहावयास मिळाली.
त्यांच्या पच्यात आदरणीय काकी, सचिन भैय्या, महेंद्र भैय्या, सौ. ज्योती वहिनी हे सुद्धा ही धुरा सांभाळताना श्रीराम कुटुंबाची आवर्जून दखल घेतात. या निमित्ताने मी एका सुसंस्कृत कुटुंबाबरोबर जोडले गेले आहे याचा मला नक्कीच अभिमान आहे.
सौ. भट्टड आरती बालमुकुंद, उपशिक्षिका, सौ. वेणूताई चव्हाण गर्ल्स हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज, फलटण.