फलटण : सचिन मोरे, संपादक- धैर्य टाईम्स
महाराष्ट्र विधान परिषदेचे माजी सभापती तथा विद्यमान विधान परिषद सदस्य आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली फलटण येथे गुरुवार दिनांक १ फेब्रुवारी २०२४ रोजी आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जाहीर मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. मात्र या मेळाव्या प्रसंगी सोशल मीडिया वर प्रसिद्ध केलेल्या बॅनर वरती कोणत्याही पक्षाच्या नावाला अथवा कोणत्याही पक्षाच्या नेत्याच्या फोटोला बगल देण्यात आली असल्याने राष्ट्रवादीच्या ( अजित पवार गट ) गोटात खळबळ माजली असल्याचे बोलले जात आहे.
वास्तविक पक्ष विरहित (अपक्ष ) विधानसभेत पोहोचणारे आमदार तर नंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या स्थापने पासून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सुप्रीमो खा. शरद पवार यांच्याशी जवळीक साधनारे व अजित पवार यांच्याशी कधीही सख्य न जुळता ही अजित पवारांच्या गटात ( अजित पवार भाजपाची संधान बांधत उपमुख्यमंत्री झाल्यावर )अलगद "फिट" होणारे रामराजे या मेळाव्यातून नवीन भूमिका घेत काय घोषणा करणार ? याकडे जिल्हासह महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिले आहे.
आमदार श्रीमंत रामराजे राष्ट्रवादी काँग्रेसला रामराम ठोकणार अशा वल्गना यापूर्वीही अनेक वेळा झाल्या होत्या मात्र रामराजे नाईक निंबाळकर हे खासदार शरद पवार यांच्या पक्षाशी नेहमीच एकनिष्ठ राहिले. दरम्यानच्या काळात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नवी राजकीय खेळी करीत भाजपाशी जवळीक साधली यावेळी मात्र रामराजे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या बरोबर हातात हात दिल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या त्यामुळेच राजकीय विरोधकांचे विचार जिथे संपतात तिथून पुढे रामराजे यांचे विचार सुरू होतात असं म्हटलं जातं.
आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जाहीर मेळाव्याचे आयोजन श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली होत असताना या मेळाव्यातून फलटण तालुक्यातील कार्यकर्त्यांना केवळ मानसिक बळ देण्याचे काम आमदार रामराजे यांच्याकडून होणार असल्याचे अनेक राजकीय विश्लेषक व्यक्त करतात तर यापूर्वीही श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी कोणत्याही पक्षाचा बॅनर न घेता फलटण मध्ये सभा घेत हा प्रयोग केल्याचे जाणकार सांगतात.
आज होत असलेल्या मेळाव्याच्या संदर्भाने कार्यकर्त्यांना आगामी लोकसभा निवडणूक च्या संदर्भाने तयार राहण्याचे आवाहन आमदार रामराजे यांच्याकडून होईल तर भविष्यात राजकीय निर्णय घेत असताना आपल्या सर्वांच्या संमतीने राजकीय वाटचाल ठरविली जाईल असे आश्वासन देत कार्यकर्त्यांना मानसिक बळ देण्याचे काम आज होणाऱ्या मेळाव्यात होईल असे त्यांच्या निकटवर्तीयांकडून सांगितले जात आहे.
भारतीय जनता पक्षाशी सुत जुळवण्याचे काम श्रीमंत रामराजे यांच्याकडून होणार का ? की नव्या राजकीय भूमिकेतून नवा अध्याय रामराजे लिहिणार? की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उपमुख्यमंत्री अजित पवार गटाबरोबर पुढील राजकीय भूमिका निश्चित करणार हे मात्र अद्याप गुलदस्त्यात असून याचे उत्तर आज कार्यकर्त्यांना मिळण्याची अपेक्षा आहे.