सचिन मोरे, फलटण.
लोकसभा निवडणुकीचे घुमशान संपूर्ण देशात सुरू झाले आहे. अनेक ठिकाणचे उमेदवार निश्चित होऊन प्रचाराच्या फेऱ्या सुरू झाले आहेत. मात्र माढा लोकसभा मतदारसंघातील उमेदवारीचा तिढा अजूनही कायमच असल्याचे बोलले जात आहे. महायुतीतील सहयोगी पक्ष भारतीय जनता पार्टी,राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शिवसेना व आर. पी. आय. (आठवले गट ) यांची माढा लोकसभेतील उमेदवारी विद्यमान खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना जाहीर झाली आहे. मात्र अजूनही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते विधान परिषदेचे माजी सभापती आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर हे महायुतीने उमेदवार बदलावा यावरच ठाम असल्याचे समजते आहे. तर अकलूज मधून मोहिते- पाटील यांनी आपला विरोध कायम ठेवला असल्याच्या चर्चा सुरु आहेत. महायुतीने उमेदवार बदलावा अन्यथा होणाऱ्या परिणामाला सामोरे जा असाच काहीसा गर्भित इशारा फलटणचे नाईक- निंबाळकर व अकलूजचे मोहिते - पाटील यांनी दिल्याचे सध्या तरी चित्र दिसते आहे. तर मध्यंतरी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (शरद पवार ) खासदार अमोल कोल्हे यांनी थेट अकलूज गाठत मोहिते पाटलांची लोकसभा निवडणुकीच्या बाबतीत भेट घेतल्याने राजकीय घडामोडींना वेग आला आहे. माढा लोकसभेसाठी इच्छुक उमेदवार धैर्यशील मोहिते - पाटील हे हाती तुतारी घेत शरद पवार यांच्या पक्षात प्रवेश करतील अशा चर्चा सोशल मीडियावर सुरू आहेत. तर फलटणचे नाईक - निंबाळकर यांच्या माध्यमातून लवकरच फलटणमध्ये तुतारीचा नाद घुमेल व शरद पवार यांच्याबरोबर पुन्हा एकदा एकत्र येत नवी राजकीय चाल खेळली जाईल अशी शक्यता वर्तवली जात आहे.
माढा लोकसभा मतदार संघातील फलटण - कोरेगाव हा विधानसभा मतदारसंघ येतो. गेली 32 वर्षाहून अधिक काळ फलटणच्या राजकारणाच्या केंद्रस्थानी रामराजेच आहेत.
तर 2019 च्या लोकसभा निवडणुकीत तत्कालीन राष्ट्रीय काँग्रेसचे सातारा जिल्हाध्यक्ष रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी काँग्रेसची काडीमोड घेतली व भारतीय जनता पार्टीत प्रवेश करीत थेट माढा लोकसभा मतदारसंघाची उमेदवारी घेत मोठा विजय संपादन केला. वास्तविक रामराजे यांच्यापेक्षा राजकारणात नवख्या असणाऱ्या रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी माढा लोकसभेतून थेट दिल्ली गाठल्याने रामराजेंच्या स्थानिक राजकारणावर याचा मोठा परिणाम झाल्याचे सध्या दिसू लागले आहे. फलटणचे स्थानिक राजकारण टिकवायचे असेल तर खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांची वाढती राजकीय ताकद रामराजे यांच्यासाठी धोक्याची घंटा होऊ शकते. त्यामुळेच खासदार रणजितसिंह यांची उमेदवारी बदलावी असा अट्टाहास रामराजे यांनी महायुतीकडे किंबहुना उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे केला असल्याचे बोलले जात आहे. मात्र रामराजेंच्या मागणीची महायुती कडून विशेष दखल घेतली जात नसल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे. त्यामुळे एकूणच रामराजे गटामध्ये अस्वस्थता असल्याचे बोलले जात आहे. श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांचे बंधू व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सातारा जिल्हा अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांना माढ्यातून उमेदवारी मिळावी याकरिता फलटणमध्ये काही दिवसापूर्वी जाहीर मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्यातून शक्ती प्रदर्शन करीत रामराजे वरिष्ठांवर दबाव तंत्राचा वापर करत असल्याचे बोलले गेले होते. वास्तविक गेली 32 वर्ष फलटण तालुक्यातील स्थानिक राजकारण संजीवराजे यांच्याशी जोडले गेले आहे. तर त्यांनी सातारा जिल्हा परिषदेचे अध्यक्ष म्हणून केलेले काम विशेष उल्लेखनीय असेच राहिले आहे. गेली तीन दशके स्थानिक राजकारण करीत असताना पूर्वी कै. माजी खासदार हिंदुराव नाईक निंबाळकर तर आता त्यांचे सुपुत्र महायुतीचे उमेदवार खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्याशी कडवा राजकीय विरोध केला आहे. मात्र आता महायुती धर्मामुळे पारंपारिक राजकीय विरोधक खासदार रणजितसिंह यांच्या उमेदवारीने रामराजे गटासमोर मोठा यक्ष प्रश्न उभा राहिला आहे. एकीकडे महायुतीचा धर्म तर दुसरीकडे स्थानिक राजकीय विरोधक खासदार रणजितसिंह यांना मिळालेली उमेदवारी अशा दुहेरी कात्रीत रामराजे नाईक -निंबाळकर सापडले आहेत.
तुतारीचा काय होईल परिणाम?
फलटणच्या रामराजे नाईक - निंबाळकर यांनी तीन दशके केलेला राजकारणात सत्तेपेक्षा विकास कामांना व राजकारणातील एकनिष्ठतेला विशेष प्राधान्य दिल्याचे दिसते आहे. मात्र या लोकसभा निवडणुकीच्या वेळी पुन्हा एकदा शरद पवार यांच्या बरोबरीने तुतारी हातात घेतल्यास या मतदार संघात परिवर्तन होईल असे राजकीय जाणकार सांगतात. त्यासंबंधी विश्लेषण करताना असे बोलले जात आहे की फलटण - कोरेगाव विधानसभा हा स्थानिक मतदार संघातून रामराजे गटाला मोठया मताधिक्याने मतदान होण्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे. तर माण - खटाव मतदान संघातून मधून सरासरी मतदान होतानाच माळशिरस मतदार संघातून आघाडी मिळेल. मात्र माढा मधून व करमाळा हे मतदार संघ कमी जास्त फरकाने तर सांगोला मतदार संघातून बरोबरीचे मतदान रामराजे गटाला मिळून मतदार संघात परिवर्तन होण्याचा अंदाज राजकीय विश्लेषक सांगतात.
माढा लोकसभा मतदारसंघात फलटणच्या नाईक - निंबाळकर परिवाराचा वेगळा प्रभाव आहे. तर तब्बल तीन दशकांचे एक हाती राजकारण व उभा केलेला गट कायम बरोबर ठेव्यासाठी धैर्यशील मोहिते -पाटील व संजीवराजे नाईक - निंबाळकर यांनी खासदार रणजितसिंह यांचे राजकीय विरोधक एकत्र करीत बैठका व चर्चासत्र सुरू ठेवली आहेत.
राजकीय सत्तेसाठी वेगवेगळ्या पक्षात जाणारी अनेक राजकीय घराणे महाराष्ट्राने पाहिलेली आहेतच. त्यामुळे फलटणचे राजघराने काही वेगळा निर्णय घेणार का याचे उत्तर काही दिवसात मिळेल. तर श्रीमंत रामराजे नाईक - निंबाळकर माढा लोकसभा मतदार संघात खासदार रणजितसिंह यांना बळ देऊन महायुतीधर्म पाळणार की फलटणमध्ये घुमणार तुतारीचा नाद हे लवकरच कळेल.