फलटण प्रतिनिधी :
महाराष्ट्राचे भाग्यविधाने कै. यशवंतराव चव्हाण यांनी सुसंस्कृत महाराष्ट्र घडविण्यासाठी राजकारणातून समाजकारण व समाज प्रबोधन यासाठी नवी पिढी घडविली. त्याच विचारातून राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक अध्यक्ष आणि देशाचे थोर नेते खा. शरद पवार यांनी सध्याच्या महाराष्ट्राच्या विचित्र आणि कठीण अशा राजकीय परिस्थितीत महाराष्ट्राचा स्वाभिमान टिकविण्यासाठी 'मी महाराष्ट्रवादी, लढा अस्मितेचा, आपल्या स्वाभिमानाचा' हा विचार आम्ही त्यांचे कट्टर समर्थक म्हणून फलटण तालुक्यात घरोघरी पोचविणार आहोत व त्यातून 'घरोघरी राष्ट्रवादी' हे अभियान यशस्वी करणार आहोत. तालुक्यातील पक्ष बांधणीसाठीचा पहिला मेळावा शुक्रवार, दि. १ डिसेंबर २०२३ रोजी सकाळी १०.०० वाजता महाराजा मंगल कार्यालय, फलटण येथे आयोजित केला असून विविध पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात येणार आहे. तरी मोठया संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे जेष्ठ नेते सुभाषराव शिंदे यांनी त्यांच्या निवासस्थानी आयोजित पत्रकार परिषदेत दिली. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राज्य सदस्य नंदकुमार मोरे उपस्थित होते.
पुढे बोलताना सुभाषराव शिंदे म्हणाले शरद पवार यांनी फलटण खंडाळा तालुक्यासाठी खूप काही दिले आहे. त्यामध्ये निरा देवघर धरण, धोम बलकवडी, औद्योगिक प्रगतीसाठी कमिन्सचा आंतरराष्ट्रीय प्रकल्प, लोणंद-फलटण- बारामती रेल्वे प्रकल्प, फलटण-खंडाळा तालुक्यातील घरोघरी व वाडीवस्ती, शेतीवर वीज पुरवठा व शेती पंपासाठी विद्युत जोडणी अशी अनेक कामे केवळ आणि केवळ शरद पवार यांच्या नेतृत्वामुळेच झाली आहेत. त्यामुळे फलटण तालुका कायमच शरद पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या पाठीशीच राहणार आहे, असेही शिंदे यांनी स्पष्ट केले.
सध्या केंद्र व राज्य शासनात शेतकऱ्यांचे विरोधी कार्य केले जात आहे. धर्म, जातपात यामध्ये लोकांना गुंतवूण जनतेच्या वीज, पाणी, उद्योग, शिक्षण, कृषि इत्यादी क्षेत्रातील प्रश्नांना बगल दिली जात आहे. श्री. शरद पवार यांनी शेतकऱ्यांसाठी, कृषि विकासासाठी ज्या शाश्वत योजना सुरु केल्या त्या बंद करण्याचे कारस्थान केंद्र सरकार करीत आहे, असे स्पष्ट करुन सुभाषराव शिंदे म्हणतात, देशाची अर्थ व्यवस्था, कृषि व्यवस्था, औद्योगिक व्यवस्था व मूलभूत सुविधा यामध्ये विस्कळीतपणा मुद्दामच आणला जात आहे. गेल्या ९ वर्षात महाराष्ट्राचा स्वाभिमर्मान दिल्लीत गहाण टाकला जात असून सर्वच क्षेत्रात महाराष्ट्राची पिछेहाट होत आहे. महिलांच्यावर अन्याय, अत्याचार चालू असून हे अशी कृत्ये करणाऱ्यांना सरकार पाठीशी घालत आहे. यामुळेच महाराष्ट्राचा स्वाभिमान टिकविण्यासाठी शरद पवार यांचेच नेतृत्व व राष्ट्रवादी काँग्रेसचा विचार आपण फलटण तालुक्यात गावोगावी पोचविणार आहोत. त्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचा फलटण तालुक्यातील पक्ष बांधणीसाठीचा पहिला मेळावा शुक्रवार, दि. १ डिसेंबर २०२३ रोजी सकाळी १०.०० वाजता महाराजा मंगल कार्यालय, फलटण येथे आयोजित केला आहे. त्यामध्ये तालुक्याच्या जिल्हा परिषद मतदार संघानुसार विविध समित्या, महिला व युवक समित्या, विविध सेलचे पदाधिकारी यांची निवड करण्यात येणार आहे. त्यासाठी फलटण तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या विचाराचे सर्व कार्यकर्ते, शेतकरी, कामगार, सहकारी संस्थांचे पदाधिकारी, युवक, महिला यांनी मोठ्या संख्येने फलटण तालुक्याचा स्वाभिामान टिकविण्यासाठी या मेळाव्यास उपस्थित रहावे, असे आवाहन शेवटी सुभाषराव शिंदे व त्यांच्या सहकाऱ्यांनी केले आहे.